आयुष्याचे गणित सोडवत असताना आणि नाना विविध संकटांना सामोरे जाण्यासाठी स्वयंप्रेरणेची (Self Motivation) ची गरज भासते. हे मोटिवेशन आपल्याला मिळते ते थोर व्यक्तीमत्त्वांकडून. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. ३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या जयंती निमित्त आज आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. समाजामध्ये जगत असताना आपणही या समाजाचा एक भाग आहे याची जाणीव सतत मनाशी बाळगून, या समाजातील काही जाचक रूढी परंपरा बदलण्यासाठी आणि स्त्रीने फक्त चूल आणि मूल याच्याशी निगडित न राहता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे येण्यासाठी जिने अहोरात्र प्रयत्न केले त्या म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.

प्रारंभिक जीवन:
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवासे असे होते. फक्त वयाच्या नवव्या वर्षी म्हणजे १८४० साली त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. ज्योतिरावांचे वडील गोविंदराव मोरे हे मूळचे फुरसुंगी येथील होते, पुण्यात फुलांचा व्यवसाय करण्यासाठी स्थायिक झाले आणि या व्यवसायावरूनच त्यांना फुले हे आडनाव मिळाले.
https://www.youtube.com/watch?v=b-qvgB1hUAY
कारकीर्द:
सुरुवातीला ज्योतिरावांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंनाही शिकवले. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात ज्योतिराव व सावित्रीबाईंनी मुलींची शाळा सुरू केली . सुरुवातीला शाळेत सहाच मुली होत्या पण वर्षाअखेर ही संख्या ४०-५० च्या घरात पोहोचली. पण सनातनी उच्च वर्णीयांनी या गोष्टीला विरोध केला, अंगावर शेण फेकले, दगड मारले, अंगावर धावून येऊन मारण्याची भाषा केली पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत त्यांनी सर्व संकटांचा सामना करत हा प्रवास चालूच ठेवला.

ब्राह्मण समाजात पतीच्या निधनानंतर विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांना विद्रूप बनवले जाई, समाज त्यांचा छळ करे, कधी या विधवा कुणातरी नाराधामाच्या शिकार बनत अशा गरोदर विधवा एक तर आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत या समस्यांवर उपाय म्हणून ज्योतिरावांनी बालहत्या प्रतिबंधक गृह चालू केले सावित्रीबाईंनी ते नेटाने चालवले. याच बालहत्या प्रतिबंध गृहात जन्मलेल्या एका ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले आणि त्याला यशवंत नाव दिले.

विधवा महिलांचे केशवपण बंद करण्यासाठी त्यांनी नाभिकांचा संप घडवून आणला विधवा पुनर्विवाह कायदा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुरा सावित्रीबाईंनी नेटाने सांभाळली.
मृत्यू:
पुण्यात जेव्हा १८९६-९७ साली प्लेगची साथ पसरली तेव्हा त्यांनी पुण्याजवळच प्लेग रुग्णांसाठी दवाखाना सुरू केला या रुग्णांची सेवा करत असतानाच त्यांनाही प्लेग झाला आणि त्यातच १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
साहित्य:
सावित्रीबाईंनी काव्य फुले हा काव्यसंग्रह तसेच बावनकशी, सुबोध रत्नाकर हेही साहित्य प्रकाशित केले.
गुण गौरव:
सावित्रीबाईंच्या या कार्याचा गौरव म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. २०१५ मध्ये पुणे विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले.

एक भारतीय समाज सुधारक, शिक्षणतज्ञ, कवियत्री, पहिल्या महिला शिक्षिका व महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महान व्यक्तिमत्व म्हणून सावित्रीबाईंना ओळखले जाते. अशा या महान व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन.

